• शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण.
  • शिक्षण कशाला म्हणावयाचे ? पुस्तके वाचण्याला ? नाही. निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळविण्याला ? नाही. ज्या शिक्षणाद्वारा इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रुप होतात त्यालाच शिक्षण म्हणावे.
  • मी शिकवितो ही भावना जर शिक्षकाच्या मनात जागृत राहील तर सगळेच काम बिघडले म्हणून समजावे. वेदांत असे म्हणतो की मनुष्याच्या आतच, मग तो लहान मुलगा का असेना, सर्व ज्ञान साठवले असते. फक्त ते जागृत करावे लागते. आणि एवढेच शिक्षकाचे काम असते. मुलांना शिक्षण द्यायचे म्हणजे एवढेच करायचे की बुद्धी कशी वापरावी हे त्यांना दाखवायचे. हात,पाय,कान,नाक,डोळे,यांचा उत्तम उपयोग कसा करायचा हे त्यांना स्वतंत्रपणे सुचले की सगळे काम अगदी सोपे झाले.
  • माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे, केवळ काही घटनांची माहिती गोळा करणे नव्हे. मुलांमध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती व ते अलग करण्याची शक्ती ह्या दोन्ही बरोबरच वाढविल्या पाहिजेत.
  • जे शिक्षण लाभल्याने सामान्य जनता जीवनसंग्रामाला लायक होऊ शकत नाही, जे शिक्षण चारित्र्यबल, परसेवातत्परता व सिंहासारखे साहस निर्माण करू शकत नाही, त्याला काय शिक्षण म्हणायचे ? ज्या शिक्षणाने माणूस जीवनात आपल्या पायांवर उभा राहू शकतो तेच खरे शिक्षण.
  • आपल्याला ‘माणूस’ निर्माण करणारे, चारित्र्य घडविणारे व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे.
  • अभावात्मक, नकारात्मक विचार माणसाला डुले बनवतात. जे आईबाप मुलांमागे रात्रंदिवस अभ्यासाचा लकडा लावतात व म्हणतात ‘हा असाच राहणार ठोंब्या’ आणि त्याच्या कानीकपाळी सदा घोकतात, ‘हा गंधा आहे’, ‘हा मूर्ख आहे’, त्यांची मुले अखेरीस तशीच निघाली आपण पाहतो न ? मुलांना चांगले म्हटल्यास, त्यांना प्रोत्साहन दिल्यास, पुढे ती खात्रीने चांगली निघतात.
  • भाषा,साहित्य, तत्वज्ञान, काव्य , कला या साऱ्या बाबतीत लोंकाच्या विचारात व प्रयत्नांत ज्या चुका होतात त्याच फक्त दाखवीत न बसता, या साऱ्या गोष्टी हळूहळू अधिक चांगल्या प्रकारे कशा करता येतील हेच सतत त्यांच्या निर्दशनास आणावयास हवे. चुकाच दाखविल्याने लोकांच्या भावना दुखावल्या जातात.
  • कुणीही कुणाला शिकवीत नसतो आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःच स्वतःला शिकवावयाचे आहे. बाहेरील शिक्षक अथवा आचार्य म्हणजे केवळ उद्दीपक कारण होय, इतकेच. या बाह्य उद्दीपणाने आमच्यातील अंतःस्थ आचार्य आम्हाला साऱ्या गोष्टी समजावून देण्यासाठी जागा होत असतो.
  • आधी आज्ञा पाळायला शिका, आज्ञा देण्याची शक्ती मग आपोआपच उत्पन्न होईल. नेहमी आधी चाकर होण्यास शिका, मगच तुम्ही मालक होण्यास लायक होऊ शकाल.
  • केवळ यथार्थ ब्रह्मचार्याच्या पालनाने समस्त विद्या एका क्षणात आत्मसात करता येतात, एकदाच ऐकलेले व समजलेले कायमचे लक्षात राहू शकते.
  • गुरुगृहवास अर्थात शिक्षकांशी व्यक्तिगत संबंध ही माझी शिक्षणविषयक कल्पना आहे, शिक्षकाच्या व्यक्तिगत संपर्काशिवाय मिळालेले शिक्षण शिक्षणच नव्हे. तुमच्या महाविद्यालयाचेच उदाहरण घ्या. त्यांना पन्नास वर्षे झाली. त्यांनी काय केले ? मौलिक विचाराचा एक देखील पुरुष त्यांनी निर्माण केलेला नाही. त्या फक्त परीक्षा घेणाऱ्या संस्था आहेत.
  • मुलांनी अगदी किशोरावस्थेपासून उज्ज्वल चारित्र्यसंप्पन व्यक्तीजवळ राहिले पाहिजे, सर्वोच्च शिक्षणाचे जिवंत उदाहरण नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असले पाहिजे.
  • सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचे व्यक्तिमत्व घडविणे हाच असायला पाहिजे. पण त्याऐवजी आपण बाहेरच्या बाजूलाच रंगसफेदी करण्यात गढून गेलो आहोत. जेंव्हा हे शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होते तेंव्हा तो मनुष्य वाटेल ती गोष्ट करू शकतो.
What is an Education ?

Leave a comment